नवरात्रोत्सवात 'मानसग्राम'च्या प्रयत्नांमुळे माधुरीताई पोहोचल्या आपल्या घरी...

Ahmednagar Breaking News
0

 ८ महिन्यांच्या विरहानंतर कौटुंबिक पुनर्मिलन. : नवरात्रोत्सवात 'मानसग्राम'च्या प्रयत्नांमुळे माधुरीताई पोहोचल्या आपल्या घरी...

​


​नगर, प्रतिनिधी. (23.ऑक्टोबर.2026.) : रस्त्यावर असहाय्य अवस्थेत भटकणाऱ्या मनोरुग्णांना उपचार देऊन त्यांचे पुनर्वसन करणाऱ्या स्नेहालय संचलित 'मानसग्राम' प्रकल्पाने यंदाच्या नवरात्रोत्सवात माणुसकीचा एक अद्वितीय अध्याय लिहिला आहे. नाशिक रेल्वे स्टेशनवर हालाकीच्या स्थितीत सापडलेल्या माधुरीताईंचे तब्बल आठ महिन्यांनंतर पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे आपल्या कुटुंबाशी भावूक पुनर्मिलन घडवून आणण्यात आले.

​काही महिन्यांपूर्वी नाशिक रेल्वे स्थानकात मानसिक आजाराशी झुंजत भटकणाऱ्या माधुरीताईंना मानसग्रामच्या टीमने आदरपूर्वक दाखल करून घेतले. सौ. दीप्ती करंदीकर व डॉ. नीरज करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच परिचारिका सोनाली साळवे, समीक्षा पवार व रवीना आत्राम यांच्या प्रेमाच्या आणि उपचारांच्या बळावर अवघ्या तीन महिन्यांत त्यांच्या प्रकृतीत कमालीची सुधारणा झाली.

​संवादादरम्यान त्यांनी आपण पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील 'मदर हार्ट' गावच्या माजी प्रधान सेवक असल्याचे सांगितले. गेल्या आठ वर्षांपासून त्या आजाराशी झुंजत होत्या. त्या अचानक घरातून निघून गेल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. घरी पती, तीन मुली व एक मुलगा त्यांची वाट पाहत होते.

​पत्ता स्पष्ट झाल्यानंतर प्रकल्प समन्वयक रमाकांत दोड्डी, परिचारिका सोनाली साळवे आणि संध्या कोठारी यांनी ३ दिवसांचा प्रवास करून माधुरीताईंना सुखरूप जलपाईगुडीला पोहोचवले. नवरात्रीच्या पावन काळात आई आणि पत्नीला समोर पाहून कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. "आम्ही देव पाहिला नाही, पण तुमच्या रूपात आज देव अनुभवला," अशा शब्दांत कुटुंबीयांनी मानसग्रामच्या टीमचे आभार मानले. नवरात्रातील हे पुनर्मिलन खऱ्या अर्थाने स्त्रीशक्ती आणि मानवतेचा विजय ठरले आहे.

स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्पाच्या माध्यमातून आजपर्यंत 700 रुग्णांना बरं करून कौटुंबिक पुनर्मिलन केलेला आहे. मानसग्राम.इसळक, ता.जि.अहिल्यानगरसंपर्क क्रमांक:-9011011006

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top